15000 लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन लाच घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदारावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. परशराम लक्ष्मण गांगोटे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. परशराम गांगोडे यांच्यावर अभोणा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्याविरोधात अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात फिर्यादी व इतर आरोपींना अटक करुन जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी गांगोडे यांनी 20 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2021 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता गांगोडे यांनी तडजोडीत 15 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाच स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. परशराम गांगोडे यांच्या विरोधात अभोणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.