ACB Trap : 50 हजाराची लाच घेताना पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच (bribe) घेताना पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सीटी चौक पोलीस स्टेशनमध्ये (police Station) बुधवारी (दि.21) करण्यात आली. संतोष रामदास पाटे (वय-30 रा. पेडगाव) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 58 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सीटी चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी न करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी संतोष पाटे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पाटे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सीटी चौक पोलीस स्टेशनमध्ये सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची 50 हजार रुपयांची रक्कम घेताना संतोष पाटे याला रंगेहाथ पकडण्यात आले. संतोष पाटे याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोलीस हवालदार गणेश पंडुरे, पोलीस नाईक गोपाल बरंडवाल, पोलीस शिपाई किशोर म्हस्के, पोलीस शिपाई केवल गुसिंगे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.