मराठवाडयातील रस्ते भूसंपादन प्रक्रियेला वेग द्या : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा कडून मराठवाड्यातील रस्त्यांची कामे वेगाने सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व रस्त्यांच्या कामांचा आणि प्रलंबित भूसंपादन प्रकरणाचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी भूसंपादन प्रलंबित प्रकरणे निकाली काढून रस्ते बांधणीतील अडथळे दूर करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले आहेत.

मराठवाडा परिसरात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी तीन प्रमुख यंत्रणांच्या साहाय्याने रस्ते बांधले जात असून, त्यासाठी मोजणी निवाडे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मराठवाडा विभागात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रस्त्यांची कामे होत आहेत. त्यात अर्धापूर ते हिमायतनगर ६४ किमी, बारसगाव रहाटी ५२ किमी, भोकर ते सरसम ३२ किमी रस्त्याचे भूसंपादन केले जाणार आहे. तसेच सरसम ते कोठारी ५७ किमी, कोठारी ते धनोडा ५६.८ किमी, उस्मानगर ते कुंद्राल ५२.०७ किमी, कुंद्राल ते वझर ४६.५२ किमी तर नांदेड ते जळकोट ६५.९५ किमीच्या रस्त्यांची कामे होणार आहेत.

तर उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग ते अक्कलकोट ३९.८२ किमीचा रस्ता, लातूर जिल्ह्यातील रेणापूर फाटा ते पानगाव २०.२ किमीचा रस्ता, लातूर ते रेणापूर फाटा २१.७५ किमी, जळकोट ते टोंगरी ४५.५५ किमी असे रस्ते होणार आहे. यासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

दरम्यान, औरंगाबाद ते सिल्लोड त्याचसोबत पैठण-शिरुर हा ११.२० किलोमीटरच्या रस्त्याचे काम होणार आहे. सिल्लोड ते फर्दापूर हा ३२.६३ किमी रस्त्याचे काम सुद्धा होणार आहे. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन ते हसनाबाद हा ६६ किलोमीटरचा रस्ता होणार आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर ते पैठण हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.