१ लाखाची लाच स्विकारताना शिक्षण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकाच्या पदास मान्यता देण्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन १ लाख रुपये स्विकारताना पालघर माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई आज पालघर जिल्हा परिषद येथे केली. या कारवाईमुळे पालघर जिल्हा परिषदमध्ये खळबळ उडाली आहे.

मोहन शशीकांत देसले (वय- ४९) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षण अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार हे खासगी शिक्षण संस्थेत सहाय्यक शिक्षक म्हणून सन २०१२ साली नोकरीस लागले होते. अद्याप त्यांच्या पदास शिक्षण अधिकारी पालघर यांनी मंजुरी दिली नव्हती म्हणून तक्रारदार यांनी उच्च न्यायालयात धांव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा बाजूने निकाल दिला होता. तरी देखील देसले यांनी त्यांच्या पदास मंजुरी देण्यासाठी ३ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे कबूल केले.

लाचेचा १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.