१५ हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा शल्य चिकित्सक एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – वैद्यकीय बिल मंजुरीसाठी २७ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सायंकाळी साडेसहाला त्यांच्याच दालनात करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे वडील शिक्षक आहेत. निवृत्तीनंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यांची शस्त्रक्रिया झल्यानंतर २ लाख ७० हजार रुपयांचे बिल झाले. पत्नीही शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने वैद्यकीय बिलाची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी बिल मंजुरीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवकर यांच्याकडे पाठविले होते. वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी रीतसर बिलाच्या तीन टक्के रकमेची शासकीय पावती केली जाते. मात्र, वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी तक्रारदार यांच्याकडे १३ टक्के रकमेची मागणी करण्यात आली होती. दहा टक्के जिल्हा शल्य चिकित्सक यांना तर उर्वरीत तीन टके रकमेची शासकीय पावती करण्यात आली असल्याचे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार यांच्याकडून बिल मंजुरीसाठीचे २७ हजार रुपयांपैकी १५ हजार देण्याचे निश्चित झाले. लाचलुचपत विभागाने सापळा रचला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तक्रारदार रक्कम देण्यासाठी डॉ. देवकर यांच्या दालनात गेले. त्यावेळी १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. देवकर यांना रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

३ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस अधिक्षक कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात