२५ हजाराची लाच स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यलयातील लिपिक अ‍ॅटी करप्शनच्या जाळ्यात

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – उताऱ्यावर वारस नोंदणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि एका खासगी इसमास अ‍ॅटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई नाशिक अ‍ॅटी करप्शनच्या पथकाने अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आज केली. या कारवाईमुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.

कनिष्ठ लिपिक विशाल बबनराव लोहार आणि खासगी इसम नाना जाधव असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांनी मालेगाव येथील अपर जिल्हधिकारी कार्य़ालयात ७/१२ उताऱ्यावर वारस नोंद होण्यासाठी अपील दाखल केले होते. अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी विशाल लोहार आणि नाना जाधव यांनी १४ मे आणि २० मे रोजी लाच मागीतली. या दोघांनी तक्रारदाराकडे १ लाख १५ हजार रुपयांची लाच मागीतली. तक्रारदार यांनी याची तक्रार मालेगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलचपत प्रतिबंधक विभागाच्या विभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष पडताळणी केली असता लोहार आणि जाधव यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लोहार आणि जाधव यांना १ लाख १५ हजार रुपयांपैकी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.