५०० रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाईन- शेताच्या सात-बारा उताऱ्यावर विहिरीची नोंद करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागून ५०० रुपयांची लाच स्विकारताना सज्जा पिंपरखेडा येथील तलाठ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज मंठा येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.

कैलास फकिरचंद संदुर्डे (वय-३० रा. सज्जा खोरडा सावंगी, मंठा, जालना) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने मौजे खोराड सावंगी येथे शेती आहे. शेतात असलेल्या विहिरीवर मोटारीसाठी आणि वीज कनेक्शन घेण्यासाठी सात-बारा उताऱ्याची गरज होती. तलाठी संदुर्डे याने उतारा दिला परंतु त्यावर विहिरीची नोंद करण्यात आली नव्हीत. तक्रारदार यांनी उताऱ्यावर विहिरीची नोंद करुन मिळावी यासाठी अर्ज केला होता. उताऱ्यावर विहिरीची नोंद करुन नवा उतारा देण्यासाठी तलाठी सुंदर्डे याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये ५०० रुपये देण्याचे ठरले. याची तक्रार तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पडताळणी केली असता संदुर्डे याने लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मंठा येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून रक्कम घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्रकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आ.वि. काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, संजय उदगीरकर, गंभिर पाटील, रामचंद्र कुदर, महेंद्र सोनवणे, संदिप लव्हारे, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रविण खंदारे यांच्या पथकाने केली.