अपघात प्रकरण : 75 लाख नुकसानभरपाई देण्याचे पोलिसांना आदेश

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणारा धीरजकुमार मोटारसायकलवरून जाताना बॅरिकेडवर धडकला. पोलिसांनी रस्ता पूर्ण बंद करण्यासाठी साखळी लावून बॅरिकेड एकमेकांत बांधले होते. शिवाय या बॅरिकेडवर रिफ्लेक्टर सुद्धा नव्हते, यामुळे त्याची मोटरसायकल बॅरिकेडवर आदळून मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी दुचाकीस्वारास 75 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. पोलीस हजर नसताना बॅरिकेड रस्त्यावर एकमेकांत बांधून ठेवल्याने या अपघातास पोलिसांना जबाबदार धरले आहे.

गंभीर जखमी झालेल्या धीरजकुमार यास अपघातानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात त्याच्यावर मेंदूसह इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एक महिन्यानंतर त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, मात्र तो अर्धवट बेशुद्धच होता. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघात केल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवला. तर धीरजकुमारने पोलिसांविरुद्ध नुकसानभरपाई मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयात आपली बाजू मांडताना पोलिसांनी सांगितले की, बॅरिकेडच्या ठिकाणी चांगला प्रकाश होता. तसेच ते दुरवरून दिसत होत. धीरजकुमारच वेगात असल्याने त्याचा ब्रेक लागला नाही व त्याला साखळी दिसली नाही. तसेच घटनास्थळी त्याचे हेल्मेट सापडले नाही. स्वत:च्या निष्काळजीपणामुळेत्याचा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी केलेल्या या आरोपांचे धीरजकुमारने खंडन केले. या अपघाताचे फोटो पाहून न्यायालयाने, घटनास्थळी बॅरिकेडच्या ठिकाणी योग्य प्रकाश नव्हता, बॅरिकेडला रिफ्लेक्टर नव्हते. तसेच पोलीस निष्काळजीपणे कोणीही कर्मचारी नसताना बॅरिकेड तिथेच सोडून गेले होते, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

पोलिसांनी बॅरिकेडसंबंधी धोरणाचे पालन न केल्याने न्यायालयाने 75 लाख रुपये 4 आठवड्यात न्यायालयात भरण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नवीन चावला म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड लावण्याचे पोलिसांना अधिकार आहेत; पण यासोबत ते चुकीच्या पद्धतीने लावून किंवा खराब बॅरिकेड लावून अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारीही पोलिसांचीच आहे.

असे आहे दिल्ली पोलिसांचे बॅरिकेड धोरण

1 उपयोगात नसताना बॅरिकेड काढून ठेवावेत.
2 तपासणीसाठी वाहने थांबतील आणि त्यांना त्यातून जाताही येईल, असे लावावेत.
3 बॅरिकेडला रात्री चमकणारे फ्ल्युरोसेंट कलर किंवा ब्लिंकर लावावे.
4 पोलीस उपस्थित नसतील त्याठिकाणी बॅरिकेड लावू नयेत.