यवत येथे २०१७ आणि २०१९ मध्ये झालेल्या अपघातात ‘साम्य’, यवतकर ‘चिंतातूर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – बाहेर गावी गोळ्यामेळ्याने फिरायला म्हणून गेलेले यवतकर, त्यांचा झालेला भीषण अपघात आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेले मृत्यू हे जणू समीकरणच आता जुळले आहे की काय अशी भीती यवतच्या नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. आज शनिवारी दि. २० जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर जवळ यवतच्या नऊ जणांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा त्या २४ मे २०१७ साली झालेल्या अश्याच एका भीषण अपघाताची यवतच्या ग्रामस्थांना आठवण झाली.

२४ मे २०१७ रोजीही यवत मधील असेच सातजण गोळ्यामेळ्याने सैलानी बाबा यांच्या दर्ग्याचे दर्शन करण्यासाठी निघाले होते आणि काळाने त्यांच्यावर घाला घालून त्यांचे प्राण हिरावून नेले होते. या अपघातामध्ये यवतचे मनोहर गायकवाड, अंकुश मेमाणे, मुबारक तांबोळी, बाळू चव्हाण, स्वप्नील चव्हाण, गोकुळ गायकवाड आणि अरुण पांडुरंग शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

हा अपघात २४ मे २०१७ रोजी नगर-औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडीजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला होता. नगरहून औरंगाबादकडे जात असताना धनगरवाडी फाट्याजवळ यवतच्या बोलेरो जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली होती. यामध्ये जीपचा पूर्ण चक्काचूर होऊन या सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता. आजची घटना आणि २०१७ साली घटना यामध्ये हेच मोठे साम्य आढळून येत आहे.

आजच्या घटनेमध्येही या मुलांची इर्टीगा गाडी ही रस्त्याच्या दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातामध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजित मुलाणी या नऊ ही जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही अपघातांमध्ये वेळ ही रात्रीच्या एक ते दोनच्या दरम्यानचीच होती.

दोन्ही अपघातांमध्ये दुभाजक ओलांडून समोरील वाहनांवर जाऊन गाड्या आदळल्या होत्या. या दोन्ही गाड्यांमध्ये जितकेपण लोक प्रवास करत होते ते सर्वचजण जागीच गतप्राण झाले. विशेष बाब म्हणजे दोन्ही अपघातांमध्ये हिंदू-मुस्लिम समाजातील लहानपणापासून मरेपर्यंत जीवाचे जिवलग मित्र म्हणून राहिलेले हे सोबतच हे जग सोडून गेले. त्यामुळे या दोन्ही अपघातांमध्ये घडलेल्या घटना यांच्यामध्ये मोठे साम्य आढळल्याने यवतचे नागरिकही बुचकाळ्यात पडले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like