Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात

केडगाव (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव गॅस टँकरने मोटारीला धडक दिल्याने चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुणे -सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता. दौंड) येथे शुक्रवारी (दि. 22) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सर्वाधिक नुकसान झालेल्या होंडा सिटी मोटारीतील एअरबॅग उघडल्याने चालक बचावला आहे. अपघातांनंतर टँकर चालक पळून गेला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर भांडगाव येथे लेन मार्किंगचे काम चालू असल्याने एक लेन बंद केली आहे. त्यामुळे एकाच लेनमधून वाहतूक चालू होती. भांडगावात दुपारी गतीरोधकाजवळ तीन मोटारी उभ्या असताना एका गॅस टँकरने एका होंडा सिटी मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. जबर धडक दिल्याने होंडासीटीसह पुढील तीनही मोटारी एकमेकांवर आदळल्या. तीन मोटारीत एकूण दहा ते बारा प्रवासी होते. यात महिलांची संख्या जास्त असल्याने अपघातानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला.

याबाबत होंडा सिटी मोटारीचे चालक विष्णूप्रासद मिश्रा म्हणाले, टँकर वेगात होता. सिटबेल्ट लावल्याने एअरबॅग उघडल्याने मी बचावलो. मोटारीला जोराची धडक बसल्याने दरवाजे उघडत नव्हते. ग्रामस्थांनी मला काचा फोडून बाहेर काढले. महामार्ग पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यवत पोलिस तपास करीत आहेत.