‘बेधुंद’ कार चालकाची पोलिसांच्या गाडीला धडक, 2 गंभीर जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – बेधुंद कारचालकाने बिट मार्शलच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नाशिक रोड येथे शनिवारी मध्यरात्री पोलीस ठाण्यासामोर झाला. अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने पोलिसांची दुचाकी जळून खाक झाली. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

राजाराम ढाले (वय-45) आणि देविदास शिंदे (वय 47) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. देविदास शिंदे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नाशिकच्या व्होक्हार्ट रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मराठा विद्या प्रसारकचे अॅड. नितीन ठाकरे यांचा मुलगा साहिल ठाकरे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बिटकोकडून रेल्वे स्टेशनकडे टाटा नेक्सॉन (एमएच 15 सीआर 1119) कारने जात होता. तर बीट मार्शल 4 चे पोलीस कर्मचारी ढाले आणि शिंदे हे ड्युटी करून पोलीस ठाण्यात येत होते. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ साहिलच्या कारची धडक पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला बसली. या धडकेत पोलीस कर्मचारी तीन फूट लांब फेकले गेले. धडक एवढी जबर होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला.

पोलीस ठाण्यातील उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ शिंदे आणि ढाले यांना जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना तेथून व्होक्हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आगीची माहिती अग्नीशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून आग विझवली.

आरोग्यविषयक वृत्त –