लक्झरी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १ ठार १० जखमी

वाठार स्टेशन : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर भारतात देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीला लोणंद-सातार रस्त्यावीरील निष्णाई पंपाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. ट्रक आणि लक्झरी बस यांच्यामध्ये आज (रविवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाश्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात सागर कमाने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शांताबाई पांडुरंग घाडगे (रा.बोरगाव), वैजंता तानाजी पवार (रा.मनेराजुरी), शोभाताई मनोहर कुंभार ( रा. मळणगाव), आक्काताई सदाशिव कुंभार ( रा. मळणगाव), आशिष कुमार केदार मल्लाप्पा (रा.मुळशी), प्रभावती बाबुराव कुंभार ( रा.मळणगाव), तानाजी दत्तू पवार (रा.मनेराजुरी), रजनीकांत कैलास कांबळे (लक्झरी चालक रा.कोल्हापूर), अनिल किसन शिंदे, वैजंता जगन्नाथ जाधव (रा.उंब्रज) हे प्रवाशी जखमी झाले आहेत.

कोरेगाव, कोल्हापूर, इस्लामपूर, बोरगाव येथील ४० जण लक्झरी बसने २८ दिवासांठी उत्तर भारतात देवदर्शनाला जात होते. कोल्हापूरहून निघालेली ही बस वाठार स्टेशनजवळ येताच भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक बसला बसली. समोरासमोर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे केबीन बसच्या केबीनमध्ये अडकले. यामध्ये ट्रक चालक विजय वैरागर (रा. केडगाव चौफुला) हा गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी आणि ग्रमस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.