भिमाशंकर येथील मंदोशी घाटात पिकअपचा अपघात, २० प्रवाशी जखमी

डेहणे (खेड) : पोलीसनामा ऑनलाईन – खेड तालुक्यातील भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात (गुरुवार दि.३१) रोजी ४ वाजता वाहकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर पिकअप पलटी झाला. याअपघात या पिकअप मधील वीस प्रवाशी जखमी झाले असुन जखमींना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात दाखल केले आहे.

गुरुवार हा तळेघरचा बाजार असल्याने परतीचा प्रवास करणाऱ्या तीस ते पस्तीस प्रवाशांना घेवुन घाट मार्गे शिरगगावकडे निघालेल्या पिकअपला (एमएच.१४.एएस. ३८७९) अपघात झाला. यात वीस प्रवाशी जखमी झाले, डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ उपचारानंतर जखमींना सोडण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या भागाबाई ठोकळ, शांताराम ठोकळ, शंकर शेळकंदे, किसन सातपुते, जाणकु सुरकुले, किसन गोडे, नारायण बानेरे, रंजना शेळकंदे, चंद्राबाई बानेरे यांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहीती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने गाडी कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर वाहन चालक फरार झाला आहे.