JCB रस्त्यावर आल्यामुळे झाला अपघात, दुचाकीस्वाराचा गेला जीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भर पावसात खोदकाम चालू असताना जेसीबी रस्त्यावर आला, त्यामुळे भरधाव जाणारा कंटेनर अचानक थांबला. त्याचवेळी मागून येणारा दूचाकीस्वार कंटेनरवर आदळल्यामुळे दूचाकीवरील एकाचा जीव गेला आहे. तर मागे बसलेल्याचा एक पाय निकामी झाला. लक्ष्मण रावसाहेब गुंजाळ (वय तीस) असे ठार झालेल्यांचे नाव आहे . तर गणेश बबन येवले (वय 30, दोघे रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. नगर) हा गंभीर जखमी झाला.

लक्ष्मण गुंजाळ व गणेश येवले हे दोघे मित्र असून काल सकाळी अकराच्या सुमारास गणेश दूचाकीवरून कारेगाव येथे आला होता. दिवसभर कारेगावात थांबल्यावर सायंकाळी दोघेही मूळ गावी दैठणे गुंजाळ येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पुणे – नगर रस्त्याने सरदवाडीजवळ आले असता, पुढे जाणारा कंटेनर अचानक रस्त्यात थांबला. त्यामुळे दोघेही कंटेनरवर जाऊन आदळले. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने लक्ष्मण गुंजाळ याचा जागीच मृत्यु झाला; तर मागे बसलेल्या गणेश येवले याच्या दोन्ही पायांना जबर मार लागला. रस्त्याकडेला खोदलेल्या खड्ड्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी अहवालात नमूद केले आहे. खड्ड्याच्या बाजूला लावलेले बॅरीकेडस् बरेचसे रस्त्यात आले होते. त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.