महाराष्ट्र : धावती ट्रॅव्हल्स पेटली, बसमधील सर्व 52 प्रवासी सुखरुप

अमरावती : रायपूरहून सुरतकडे जात असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतला. सुदैवाने बसमधील सर्व ५२ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तिवसा पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली.

रायपूरहून प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल बस नागपूर, अमरावती मार्गे सुरतला जात होती. नागपूर अमरावती महामार्गावरील तिवसा पोलीस ठाण्याच्या समोर पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अचानक बसने पेट घेतला. यावेळी सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. बसमध्ये धुर झाल्याने एकच गोंधळ उडाला. बस पेटलेली पाहून पोलीस व स्थानिक तरुणांनी पुढे होत बसमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. तिवसा पोलीस ठाण्याजवळच नगपालिकेची अग्निशमन गाडी असल्याने त्यातून पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली. बसच्या मागील बाजूचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.