‘बर्थ डे’ पार्टी ठरली शेवटची ! ट्रॅक्टर-कार धडकेत ४ तरुणाचा मृत्यु

चंद्रपूर : वाढदिवसाची पार्टी करुन कारने घरी जात असताना तिने ट्रक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ तरुणांचा मृत्यु झाला. बर्थ डे पार्टी शेवटची ठरली. चंद्रपूर – मूल मार्गावरील अजयपूर येथे ही घटना घडली.

दर्शना उधवाणी (वय २५), प्रगती निमगडे (वय २४), मोहम्मद अमन (वय २३) आणि स्मित पटेल (वय २५) अशी अपघातात मृत्यु पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्व जण मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील मुले होती. या अपघातात योग गोगरी (वय २३) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याबाबतची माहिती अशी, योग गोगरी याचा वाढदिवस होता.वाढदिवसानिमित्त त्याने आपल्या मित्रांना पार्टी देण्याचे ठरविले होते.त्यानुसार चंद्रपूरमधील एका हॉटेलमध्ये ते पार्टी साठी गेले होते.पार्टी झाल्यानंतर ते हुंदाई क्रेटा गाडीने घरी परत येत होते.अजयपूर येथे अचानक एक ट्रॅक्टर शेतातून मुख्य रस्त्यावर आला.भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या कारला हा ट्रॅक्टर दिसला नाही.त्यांच्या गाडीने ट्रॅक्टरला जोरात धडक दिली.ही धडक इतकी जोरात होती की, त्यात हुंदाई क्रेटा या गाडीचा चक्काचुर झाला.अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने गावकरी घटनास्थळी धावून गेले.त्यांनी कारमधील सर्वांना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.मात्र, उपचारापूर्वीच चौघांचा मृत्यु झाला होता.योग गोगरी हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.