PMPML बसचा ब्रेक निकामी झाल्याने 2 महिला जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने दोन दुचाकीस्वार महिलांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार युवती बचावल्या आहेत. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस तीन मोटारी, रिक्षासह दुचाकीला धडक दिली. पौड रस्त्यावरील परमहंसनगर परिसरात ही घटना घडली.

शची दंडवते (वय २०) आणि आदिती कुलकर्णी (४०, रा. दोघी रा. कोथरूड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पीएमपी बसचालक बापू किसन आवटे याच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शची दंडवते यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावरील परमहंसनगर परिसरातून गुरुवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोथरूड डेपो ते सुखसागरनगर या मार्गावरील बस पौड फाटा चौकाच्या दिशेने जात होती. परमहंसनगर परिसरात उतार आहे. त्यावेळी दुचाकीस्वार शची दंडवते परमहंसनगरकडे जात होत्या. त्यावेळी भरधाव बसचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि बसने दुचाकीस्वार दंडवते यांना धडक दिली. नियंत्रण सुटल्याने तेथून जात असलेल्या दुचाकीस्वार आदिती कुलकर्णी यांना बसने धडक दिली.

त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन मोटारी, एक रिक्षा तसेच दुचाकीला बसने धडक दिली. या भागात मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला पत्रे लावण्यात आले आहेत. बस पत्र्यावर आदळल्याने वेग कमी झाला. बसचालक आवटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. आवटे याची चौकशी करण्यात आली. पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.
शहरातील अनेक प्रमुख मार्गावर नादुरुस्ती पीएमपी बस धावत आहेत. कोथरूडमधील दुर्घटनेनंतर पुन्हा ही बाब अधोरेखित झाली आहे. धावत्या पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याने पादचारी तसेच दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पीएमपी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत.