आंबेनळी घाटात पुन्हा अपघात

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेनळी घाट हे अपघात केंद्र बनू लागलं आहे. आंबेनळी घाटामध्ये आज सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरहून माथेरानला जाणारी एक बीएमडब्यू गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीची जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत राजेंद्र सोसटे (रा . भोसरी, पुणे) हे शनिवारी सकाळी कारने (एमएच १४ एफजी ००७७) पोलादपूरहून महाबळेश्वरकडे निघाले होते. पोलादपूर हद्दीत आंबेनळी घाटातील बावली टोकाजवळ त्याचा कारवरून ताबा सुटला. यानंतर कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. अपघातवेळी प्रशांत सोसटे कारमधून बाहेर फेकले गेले व दरीतील एका झाडावर अडकून पडले.

पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाच्या ही घटना निदर्शनास येताच त्याने तातडीने प्रतापगड व वाडा कुंभरोशी येथील नागरिकांना अपघाताची माहिती दिली. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चालक प्रशांत सोसटे याला दरीतील झाडावरून बाहेर काढले.
वाडा कुंभरोशी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
नेमका हा अपघात कशामुळे झाला, गाडीवरील नियंत्रण कशामुळे सुटले याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस चालकाची चौकशी करणार असून यासंदर्भातील तपास सुरु आहे.

 

यापूर्वीही झाला होता अपघात –

आंबेनाळी घाटामध्ये तीन महिन्यांपूर्वी २८ जुलै २०१८ रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये विद्यापिठाच्या २९ कर्मचारी आणि प्राध्यापकांचा दूर्देवी मृत्यू झाला होता. ८०० फूट खोल दरीत कोसळलेली बस दोन महिन्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी दरीतून बाहेर काढण्यात आली. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर बस दरीतून वर काढण्यात यंत्रणांना यश आले. या अपघातामध्ये प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावले होते.