कारवाई चुकविण्यासाठी पळालेल्या रिक्षाचा अपघात ; ५ प्रवाशी जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षात फ्रंट शीट घेऊन प्रवाशी वाहतूक करताना पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी पळालेल्या रिक्षाचा अपघात होऊन झालेल्या घटनेत ५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना प्रेमदान चौकाजवळ घडली.
जखमींना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे . याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रिक्षा चालक शुभम राजेंद्र आठरे ( वय २२, रा. तवलेनगर ) याच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत प्रवाशी अक्षय तरटे, प्रशांत साबळे , सुजित खामकर , मंगेश आमले, प्रतीक वाळके हे सर्वजण जखमी झाले आहेत.

शहर वाहतूक शाखेच्यावतीने दोन दिवसापासून नियमबाह्य रिक्षा वाहतुकीवर कारवाई सुरु आहे. यात परवाना नसणे, परमिट नसणे, फ्रंट शिट, जादा प्रवाशी बसविणे या प्रकारचा समावेश आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे व कर्मचारी गवळी व ठोकळ हे सरकारी वाहनातून कारवाईसाठी नगर – सावेडी व एमआयडीसी परिसरात पेट्रोलींग करून प्रेमदन चौकाकडे येत असताना त्याची सरकारी गाडी प्रेमदान चौकात थांबली.

याचदरम्यान शहरातून एमआयडीसीकडे शुभम आठरे हा रिक्षात ( एमएच १६ सीई७३७४ ) फ्रंट सीटवर प्रवाशी घेऊन जात असताना त्याला वाहतूक शाखेची गाडी दिसली. त्याने फ्रंट सीटाची कारवाई टाळण्यासाठी रिक्षा प्रोफेसर काँलनीकडील रस्त्याकडे वाळवून क्रिस्टल हॉटेलशेजारील बोळीत भरधाव घेऊन पळ काढला. तो तेथून लॉर्ड बिशप वसाहतीत घुसला. तेथे रस्त्याचा अंदाज न आल्याने तो सगळगिळे शशिकांत यांच्या घरासमोर लावलेल्या दुचाकीवर ( एमेच बाईक्स ५४८४ ) धडकला. यात रिक्षा, दुचाकीचे मोठे नुकसान झाले.