पुण्यात शिवशाही बसचा अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यात कळंब येथे शिवशाही बसचा अपघात झाला. यामध्ये ८ ते १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री १० सुमारास झाला. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

याबाबत माहिती अशी की, कळंब कॉलनीजवळ नाशिककडून पुण्याकडे ही बस जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करताना शिवशाही बस महामार्गावर उलटली. बस पलटी झाल्याने अपघातात ८ ते १० जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली. जखमींवर मंचर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

यापूर्वी सुद्धा शिवशाही बसचे वारंवार अपघात घडल्याचं आपलं पाहिलं आहे. पण टाळेबंदी नंतर हा एसटी बसचा पहिलाच अपघात घडला असल्याने यापुढे वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

खेड घाटात अपघात

पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा रविवारी भीषण अपघात झाला होता. दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते.

घडलेला अपघात इतका भीषण होता की दुचकीला धडक दिल्यानंतर मालवाहतुक ट्रक पलटी झाला. तसेच दुचाकीवरील दोघे जण खाली पडून जखमी झाले. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने दुचाकीस्वारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घाट परिसरात सातत्याने पाऊस सुरु आहे. म्हणून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाहन सावकाश चालवा अशा सूचना सतत देण्यात येत आहे.