निवडणुकीचे काम संपवून परतणाऱ्या 2 शिक्षकांचा अपघातात मृत्यू

उमरेड : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीचे काम आटोपून परतत असताना झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नागपूर महामार्गावर असलेल्या चंपा शिवारात आज (शुक्रवार) पहाटे साडेतीनच्या सुमरास झाला. नुकेश नारायण मंढूले (वय-३८) आणि पुंडलीक बापूराव बहे (वय-५६) अशी अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. तर विजय बोहरुपी, रमेश पिपरे हे दोन शिक्षक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक पहाटेच्या सुमारस मोटारकार (एमएच १२ जीएफ ४५४७) मधून उमरेड येथे जात होते. त्यावेळी रमेश पिपरे हे गाडी चालवत होते. त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यामध्ये नुकेश मेंढुले यांचा जागीच मृत्यू झाला तर पुंडलीक बहे यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. नुकेश उमरेड येथील अशोक विद्यालयात कार्यरत होते तर पुंडलीक बहे हे कुही तालुक्यातील सावळा येथील खापर्डे विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
यवतमाळमध्ये देखील मतदानाचं काम आटपून परतणाऱ्या शिक्षकांच्या एका वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात शुक्रवारी (12 एप्रिल) अल्टो आणि बोलेरो कारमध्ये अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.