दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात ; मायलेकीसह ३ ठार

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन – दापोलीहून रत्नागिरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मॅक्झिमोने डंपरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मॅक्झिमो चालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना दापोली-खेड मार्गावरील नारगोली येथे घडली.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीजवळील पाली येथे राहणारे संदीप शेलार हे साखरपा ते दापोली अशी वृत्तपत्रांच्या पार्सलची वाहतूक करतात. नेहमीपेक्षा सुमारे दीड तास उशिरा ते दापोली येथे मॅक्झिमो गाडी (एम.एच. ०८ एजी २०९५) घेऊन पोहोचले. त्यानंतर ७.३० वाजता ते दापोलीतून रत्नागिरीकडे ६ प्रवाशांसह निघाले असता त्यांची गाडी दापोली-खेड मार्गावरील नारगोली येथे आली. त्यावेळी एका वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या डंपर (एमएच १० झेड २५२०) वर मॅक्झिमो जोरात आदळली. या अपघातात चालक संदीप शेलार (रा. पाली, ता. रत्नागिरी), दापोली नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी मधुकर कांबळे (वय ५५, रा. दापोली), जगदीश पारदुले (वय ३३, रा. देवके), मदिरा शेख (वय ३८) व त्यांची मुलगी फैमिदा शेख (वय १४, रा. पाजपंढरी) हे मृत्युमुखी पडले, तर दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी नीलेश पवार व आडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप पावसकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कळंबोलीच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रथम दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले व त्यानंतर मोठ्या शर्थीने इतरांना बाहेर काढण्यात आले. त्यात फैमिदा शेख या मुलीच्या देहात धुकधुकी वाटत होती; मात्र दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणताना तिचाही मृत्यू झाला. मॅक्झिमो डंपरखाली अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. जेसीबीने मॅक्झिमोला बाजूला काढल्यानंतर दोन्ही बाजूची वाहने सोडण्यात आली.