अस्थी विसर्जन करून परतणाऱ्यांवर काळाचा घाला : अपघातात 7 ठार, 15 जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – अस्थी विसर्जन करून परतणाऱ्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 7 ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण जोडमोहा येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात आज (रविवार) सायंकाळी पाचच्या सुमारास झाला.

जोडमोहा येथील काहीजण अस्थी विसर्जन करण्यासाठी गेले होते. अस्थी विसर्जन करून परतत असताना त्यांच्या वाहनाला एका मालवाहू वाहनाची जोरदार धडक बसली. याअपघातात 7 ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. हा अपघात कळंब मार्गावर वढोणा शिवारात आज सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नसून हे सर्वजण जोडमोहा या गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.

You might also like