भाजप खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील जीप जळून खाक

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अचानक आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण वाहन जळून खाक झाले आहे. कल्याण-शहाड मार्गावर शनिवारी दुपारी (दि. 27) ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.

खासदार कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील अंजूर-दिवे गावात राहतात. शनिवारी दुपारी खासदार पाटील हे कल्याण जवळच्या शहाड परिसरात एका बैठकीला वाहनाच्या ताफ्यासह जात होते. यावेळी त्यांच्या वाहनाच्या मागे-पुढे कार्यकर्त्यांची पाच वाहने होती. शहाड परिसरात पाटीदार भवन नजीक रस्त्यावरच अचानक खासदारांच्या ताफ्यातील स्कार्पियो जीपने अचानक पेट घेतला. पण काही क्षणात जीपमध्ये बसलेल्यांनी बाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनचा एक बंब दाखल होऊन जवानांनी जीपला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र या आगीत संपूर्ण जीप जळून खाक झाली. खडकपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.