नगर-पुणे रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात ; दोन ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात बस व ट्रक मध्ये कार सापडून दोन जण जागीच ठार झाले. आज सकाळी हा अपघात झाला.

प्रसाद रावसाहेब उंडे, भास्कर रंगनाथ डावखरे (दोघे राहणार राहुरी) यांचा मयतात समावेश आहे. जखमी कोणीही नाही. गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटातील वळणावर बस-ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कार सापडली. त्यात कारचा चक्काचूर होऊन आतील दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर बस व ट्रकचे चालक वाहने जागेवरच ठेवून पसार झाले. या अपघातामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली. त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत भोसले यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहने रस्त्यावरून दूर केली. त्यामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.