मुंबई-पुणे महामार्गावर स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायरचा भीषण अपघात ; २ ठार, ३ गंभीर जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वेगातील कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कामशेत हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दर्शन ढाब्यासमोर गुरुवारी सायंकाळी झाला.

गुरुवारी सायंकाळी पुण्याकडून मुंबईकडे स्वीफ्ट कार (एमएच १२ टीवाय ७८६४) निघाली होती. कामशेत खिंड उतरत असताना कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार मुंबई लेनच्या डिव्हायडरला धडकून पुणे लेनवरून पुण्याकडे निघालेल्या स्विफ्ट डिझायर (एमएच १२ केयन ९८८९) या कारच्या बोनेटवर येऊन पडली.

या अपघातात स्वीफ्ट कार (एमएच १२ टीवाय ७८६४) मधील मनोज मल्लप्पा प्याटीस (२८, रा. शांतीनगर ,येरवडा पुणे) आणि तेजस प्रकाश सोनवणे (२३, लोहियानगर पुणे) या दोघांचा मृत्यू झाला. तर अक्षय विलास खाजगे ( २३, रा. शांतीनगर येरवडा,पुणे), राम हनुमंत दुब्बल ( २०, रा. शांतीनगर येरवडा ,पुणे), चालक कृष्णय्या कोळी (वय २३, रा. ताडीवाला रोड पुणे) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे लेनवरील स्विफ्ट डिझायर (एमएच १२ केयन ९८८९) या कारमधील चालक रोहित नंदकिशोर दोडकेकर (३१, रा.रहाटणी काळेवाडी) हे जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. तपास पोलीस करत आहेत.