Satara News : कराडजवळ स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात, 4 जण ठार

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील चार जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवार) दुपारी दीडच्या सुमारास कराड तालुक्यातील वहागावच्या हद्दीत झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कार वहागाव हद्दीत आली असता कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असणारी कार दुभाजकावरुन विरुद्ध बाजूच्या लेनवर गेली. त्याचवेळी कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला कार धडकली. यावेळी मोठा आवाज झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवले. मात्र, एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, मागील रविवारी आठ दिवसांपूर्वी याच महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन ठार झाले होते. तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. आठ दिवसात कराडजवळ हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.