पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; 2 ठार

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे-सोलापूर महामार्गावर पेठ (ता. हवेली) गावाच्या हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपाजवळ दुचाकी, मालवाहू छोटा टेम्पो व स्विफ्ट डिझायर अशा तिहेरी वाहनांच्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. ०५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

भैरवनाथ बालाजी साळुंखे (वय-२३, मोशी, ता. हवेली) व दत्ता महादेव टिकाळे (वय-२३, सध्या रा. वाघोली ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून भैरवनाथ साळुंखे आणि त्याचा मित्र दत्ता टिकाळे (मूळ रा. वाथवाडा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) दिवाळीच्या सुट्टीसाठी मूळ गावाकडे निघाले होते. दोघेही भरधाव वेगाने जात असताना पेठ गावच्या हद्दीत आल्यानंतर त्यांनी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. व दोघेही दुचाकीवरून उडून पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले . तेवढ्यातच पुण्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी स्विफ्ट गाडीने दोघांना चिरडले यातच भैरवनाथ साळुंके याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या दुसऱ्या मित्राला लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले उरुळी कांचन कडे जात असताना हा अपघात झाला होता. त्यांनी प्रसंवधान साधून दोघांनाही रुग्णालयात पाठविले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.