भीषण अपघातात ; पोलीस निरीक्षक जाधव आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  पुणे अहमदनगर महामार्गावर कारच्या भीषण अपघातात बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.  त्यांच्या मुलीचा बुधवारी वाढदिवस असल्याने ते तिला भेटण्यासाठी निघाले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील शिरुरपासून पुढेअसलेल्या बेलवंडी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. मुलीच्या वाढदिवसादिवशीच आईवर काळाने झडप घातली. अपघातात निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्या पत्नी  सुजाता अनिलकुमार जाधव यांचा मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान निरीक्षक जाधव यांचा मृत्यू झाला.

पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव हे बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस ठाण्यात नेमणूकीस हाेते. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील एक मुलगी पुण्यात राहण्यास आहे. तिचा बुधवारी वाढदिवस होता. दोन दिवसांपासून ते रजेवर होते. मंगळवारी रात्री ते आणि पत्नी सुजाता यांच्यासह मुलीला भेटण्यासाठी पुण्याला येत असताना बुधवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास पुणे नगर महामार्गावर शिरुरजवळ बेलवंडी गावाच्या नजीक आल्यावर त्यांची कार डिव्हायडर ओलांडून पलिकडे गेली आणि समोरून येणाऱ्या एका कंटेनगरला धडकली. कारची कंटेनरची जोरदार धडक बसल्याने त्यात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले. त्यामध्ये सुजाता यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती शिरूर पोलीसांना नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. त्यावेली पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस कर्मचारी वैभव मोरे, कडूस, भगत, शिंदे, मोरे, व एक पोलीस मित्र असे सहा जण तीन दुचाकींवरून घटनास्थळी गेले. त्यांनी तात्काळ दोघांनाही बाहेर काढले. तेथून जाणाऱ्या एका अम्ब्यूलन्सला थांबवून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच सुजाता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अनिलकुमार जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. उपचारा दरम्यान बुधवारी सांयकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.

अनिलकुमार जाधव हे मुळचे सांगलीचे रहिवासी होते. त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.