देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, प्रवीण दरेकर आणि माजी मुख्यमंत्री सुखरूप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. पाठीमागुन येणार्‍या ताफ्यातील पोलिस वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. जळगाव जवळील महामार्गावर बुधवारी रात्री 9 वाजता हा अपघात झाला. दरम्यान, या वाहनांच्या ताफ्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील होते. मात्र, ते दुसर्‍या वाहनामध्ये होते आणि सध्या ते सुखरूप आहेत. झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणाला देखील इजा झालेली नाही.

सध्या विरोधी पक्षनेते राज्याच्या विविध भागात दौरे करीत आहेत. फडणवीस आणि दरेकर हे सध्या कोविड रूग्णालयांच्या तयारीचा आढावा घेणे आणि तेथील सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर परिस्थितीवर आवाज उठवण्याचे काम करत आहेत. मागील दोन दिवस मुंबई आणि ठाण्याचा दौरा झाल्यानंतर ते दोघेही जळगावच्या दौर्‍यासाठी रवाना झाले होते. दौर्‍यावर असताना हा अपघात घडला आहे.