दुर्दैवी ! 3 वाहनांच्या विचित्र अपघात तिघे ठार, दोघे गंभीर जखमी, चाकणमधील घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन –   कार, स्कॉर्पिओ आणि कंटेनर या तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र भीषण अपघातात सिलेंरो कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव चौकात सोमवारी (दि. 26) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृतातील दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत.

प्रफुल्ल संपत सोनवणे ( वय. 27) , अक्षय मारुती सोनवणे ( वय. 23 वर्षे दोघेही ,रा.वाकी बुद्रुक ), अविनाश रोहिदास अरगडे ( वय. 28 वर्षे,रा.कडूस,ता.खेड ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. मृत अक्षय हा तळेगाव चौकात वेदिका चाय या नावाने हॉटेल व्यवसाय करत होता.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूरहून तळेगावच्या दिशेने जाणा-या (एमएच- 04- एफ यु- 0191) या कंटेनरची राजगुरूनगर बाजूकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक बसली. स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला आणि सिग्नलला उभ्या असलेल्या सिलेंरो कारला भरधाव स्कॉर्पिओची जबर धडक बसली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर स्कॉर्पिओ गाडीतील दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.