Satara News : सुरूरजवळ अपघात; एक जण जखमी, लहान बाळासह तिघेही बचावले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – येथील पुणे-बेंगलोर महामार्गावर वाई तालुक्यातील सुरूर या गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हॉटेल पार्क इनसमोर दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला, तर लहान बाळासह तिघे बचावले आहेत.

अपघातग्रस्त दोन्ही वाहने सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात होती. दोन्हीही वाहनांचा वेग जास्त होता. दोन्हीही वाहने रस्त्यावरून समांतर जात होती. अचानक कार (क्र. एमएच १४ बीआर ७८९८)वरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती कार (क्र. एमएच ०३ डीके ०६३६) ला आडवी झाली. त्यामुळे अपघात झाला. जबर धडक बसल्याने कार (क्र. एमएच ०३ डीके ०६३६) दुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्यावर गेली, तर कार (एमएच १४ बीआर ७८९८) ने दोन उलट्या घेऊन रस्ता दुभाजकात उलटली. ही कार दहा फूट उंच उडून रस्त्यावर आपटली. या कारचा एक टायर पूर्ण निखळला गेला.

अपघात ठिकाणाहून अंदाजे १०० फूट लांब अंतरावर ही दोन्ही वाहने फरफटत गेली. यापैकी एका वाहनात फक्त चालक होता, तर दुसऱ्या वाहनात पती, पत्नी व चार महिन्यांची चिमुकली होती. यापैकी महिलेला किरकोळ स्वरूपाची जखम झाली. सुदैवाने इतर सर्व जण सुखरूप बचावले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.