दुर्देवी ! मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा अपघाती मृत्यू, आई गंभीर जखमी

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. केसलवाडा (ता. लाखनी) येथे शनिवारी (दि. 27) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. मुलीच्या लग्नाचा आनंद सोहळ्याची तयारी करताना वडिलांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

दिलीराम कवडू वाघाये (वय 50 रा. केसलवाडा (वाघ) असे अपघात ठार झालेल्याचे नाव आहे. संगिता वाघाये असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे. त्यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिलीराम वाघाये यांची मुलगी स्नेहा वाघाये हिचे 21 एप्रिलला लग्न ठरले आहे. त्यासाठी नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी ते पत्नी संगीताला सोबत घेऊन दुचाकीवरून शनिवारी सकाळी निघाले होते.

लाखनी येथे पेट्रोल भरून केसलवाडा (राघोर्ते), किटाळी, पालांदूर, पेंढरी आदी गावांना लग्न पत्रिका वाटप करण्याचे त्यांचे नियोजन होते. राष्ट्रीय महामार्गावर केसलवाडा फाट्यावर लाखनीकडे वळताना समोरून येणा-या ट्रेलरने ( आरजे -04-जीए- 8322) दुचाकीला जबर धडक दिली. यात दिलीराम जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेली पत्नी संगीता गंभीर जखमी झाली. जखमीं संगिता यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.