घरफोडी करून पळणारे चोरटे अपघातामुळे पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – घरफोडी करून पळून जात असताना चोरट्यांच्या कारचा अपघात झाल्याने चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. ही घटना नागपुरमधील बेलतरोडी भागातील एका घरात घरफोडी करून पळून जात असताना जयस्तंभ चौकात अपघात झाला आणि चोरटे पोलिसांच्या हाती लागले. अजय उर्फ अज्जू वरखडे आणि रोशन पाचे अशी या सराईत चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासात या दोघांनी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरली आहेत. तसेच अनेक घरफोड्या केल्या आहेत. रविवारी मध्यरात्री या दोघांनी बेलतरोड परिसरात एका बंगल्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला. चोरलेला मुद्देमाल त्याच बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या आय टेन या कारमध्ये ठेवून ती कार घेऊन पळून जात होते.

चोरी करून पळून जात असताना रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना कारचा संशय आला. त्यांनी कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरु केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे समजताच चोरट्यांनी कार भरधाव वेगात चालवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कारचा पाठलाग करत असातना कारचा जयस्तंभ चौकाजवळ अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चार दिवसापूर्वी त्यांनी नागपूरच्या विविध भागांमध्ये चार घरफोड्या केल्या. तसेच दोन वाहनदेखील चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली.