टेम्पो-जीप अपघातात ५ जण ठार ; लग्नासाठी जाणाऱ्या कुटुंबावर घाला

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावर टेम्पो आणि जीप यांच्या समोरासमोर भीषण अपघात होऊन त्यात किमान पाच जण ठार झाले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चेरापाटीनजीक रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

ज्ञानोबा सोनकांबळे (वय ४०), अरविंद सोनकांबळे (वय ३०), पुष्पा सोनकांबळे (वय ४५), कांताबाई सोनकांबळे (वय ५५), छकुली सोनकांबळे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत.

जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील सोनकांबळे कुटुंबीय अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे लग्नसोहळ्यासाठी एका जीपने गेले होते. लग्नसोहळा आटोपून धामणगाव येथे येत असताना जामकडून शिरुर ताजबंदच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जीपमधील पाच जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले. त्यात आरोसी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनीता सोनकांबळे, रितेश सोनकांबळे, प्राची सोनकांबळे (सर्व रा. धामणगाव) यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच जळकोट, चेरा आणि परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उदगीर येथे पाठवून दिले.

जीपमधील वऱ्हाडींमध्ये एक वर्षाची प्राची अरविंद सोनकांबळे ही होती. दरम्यान, टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. यावेळी चिमुकली जीपमधून बाहेर फेकली गेली. त्यामुळे ती जखमी झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये जीपचा चक्काचूर झाला आहे.

जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचार करून उदगीर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

You might also like