देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या ‘आत्महत्या’, ‘NCRB’च्या अहवालातून आकडेवारी समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी क्षेत्रावरील संकटामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. देशात 2018 मध्ये देशभरात 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2017 च्या तुलनेत शेतकरी आत्महत्येत काही प्रमाणात घट झाली असली तरी देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. NCRB (नॅशनल क्राइम ब्युरो रेकॉर्ड्स) ने जाहीर केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

वर्ष 2016 मध्ये 11 हजार 379 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यामध्ये 2018 साली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संखेत थोडीफार घट झाली. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशात झालेल्या एकूण शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्येपैकी महाराष्ट्रात 34.7 टक्के आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. कर्नाटकात 23.2, तेलंगणा 8.8, आंध्र प्रदेश 6.4 आणि मध्य प्रदेश 6.3 टक्के अशी क्रमवारी आहे.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 5763 शेतकऱ्यांनी आणि 4568 शेतमजुरांनी आत्महत्या केली. 5457 पुरुष शेतकऱ्यांनी आणि 306 महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या या वर्षात केल्या. शेतमजुरांच्या बाबातीत 4071 पुरुषांनी तर 515 महिला मजुरांनी आत्महत्या केल्याचे अहवालातून समोर आले आहे. तसेच 2017 मध्ये 12 हजार 241 जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर कृषी संकटामुळे 10 हजार 655 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सर्वाधिक प्रमाण 2016 मध्ये होते. 2016 मध्ये 11 हजार 379 शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केली. तर 11 हजार 173 बेरोजगारांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

दिल्ली, गोवा, मेघालय, ओडिशा, उत्तराखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी एकही शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केली नसल्याचे एनसीआरबीला कळवले आहे. शेत मालाला हमी भाव नसणे, नैसर्गिक आपत्ती, कृषी संकट या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/