#Loksabha : भोपाळमध्ये ‘दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह’ सामना रंगणार ?

भोपाळ : वृत्तसंस्था – भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भोपाळ मधून निवडणूक लढण्याचा इरादा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला आहे. आव्हानात्मक जागांवर काँग्रेसच्या बढ्या नेत्यांनी लढले पाहिजे असे मत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बोलून दाखवल्या नंतर दिग्विजय सिंह हे भोपाळ मधून लढण्यास तयार झाले आहेत. तर त्यांना आव्हान देण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

कडव्या हिंदुत्वाच्या विरोधात दिग्विजय सिंह यांनी आघाडी उघडण्याचे राजकारण नेहमीच केले आहे. त्यांच्या या राजकारणाला शह देण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञा सिंह आणि दिग्विजय सिंह हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या सारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांना दिग्विजय सिंह यांनी भगवे दहशतवादी म्हणून गणले होते.

२६/११ चा हल्ला हा भगव्या दहशतवाद्यांनी केला आहे असे वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले होते. कसाबला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर हा हल्ला पाकिस्तानने केल्याचे सिद्ध झाले. मात्र तेव्हा पासून दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह या राजकीय वैराच्या अध्यायाला सुरुवात झाली. साध्वी प्रज्ञा सिंह या भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत. तर त्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी देखील आहेत. दिग्विजय सिंह आणि साध्वी प्रज्ञा सिंह असा सामना झाल्यास संपूर्ण देशाचे लक्ष भोपाळ लोकसभा निवडणुकीकडे लागून राहण्याची शक्यता आहे.