महाराष्ट्रात आणखी एक भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सोलापूरचे खासदार महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याचे भाजपला धक्का बसला असतानाच आता पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे सहयोगी खासदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय काकडे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पवारांकडून आपल्याला निमंत्रण आल्याची माहिती संजय काकडे यांनी दिली आहे. संजय काकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून वक्तव्य केले होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा काकडे चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा असून या जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे पुन्हा इच्छुक असून त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संजय काकडे यांनी उदयनराजे यांच्यावर टीका करत भाजपच्या उमेदवारीवर दावा केला होता.

मागील काही वर्षापासून संजय काकडे यांनी वादग्रस्त विधानं केल्यामुळे भाजप अडचणीत आला होता. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. उदयनराजे यांचे पक्षासाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित करत काकडे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला. मात्र, त्यांच्या या विधानामुळे ते अडचणीत आले आहेत.