डीबीरूममध्येच आरोपींचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असणार्‍या तीन आरोपींनी डीबी रूममध्येच विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्याकडे विषारी औषध नेमके कोठून आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीसही त्याचा शोध घेत आहेत.

मिथून उर्फ अमोल आनंदा चौगुले (वय 23), योगेश केशव मचाले (वय 24) आणि वैभव उर्फ दादा बाळासाहेब आरवडे (वय 19, मांडवगणफराटा, ता. शिरूर) अशी आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पंधरा दिवसांपुर्वी शिरूर येथील एका व्यक्तीला बीसीचे पैसे घेऊन जात असताना तिघांनी लुटले होते. त्याच्याजवळील 10 लाखांची रोकड त्यांनी चोरली होती. या गुन्ह्यात सहा दिवसांपुर्वी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांना आज घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी घेऊन जाण्यात येणार होते. पंच आणि काही कर्मचारी येण्याची वाट पाहत असताना या तिघांना डीबीरूममध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. काही वेळातच हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपींनी डीबीरूममध्येच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/