पुतण्यानेच चोरला काकाच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुतण्यानेच काकाच्या घरात चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात पोलिसांनी पुतण्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पुतण्याने काकाच्या घरातून सहा लाख दहा हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. पोलिसांनी ५ लाख ७ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. ही घटना २७ एप्रिल रोजी प्रकाश नगर येथे घडली.

बालाजी शिवाजी निकम असे अटक करण्यात आलेल्या पुतण्याचे नाव आहे. तर श्रीकांत मोहनराव घोडके (रा. प्रकाश नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

श्रीकांत घोडके हे कुटुंबासमवेत रुग्णालयात गेले होते. त्यावेळी घरामध्ये त्यांचा मुलगा अर्जुन आणि पुतण्या बालाजी हे दोघे घऱात थांबले होते. रात्री घरी आल्यानंतर घरातील ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, २ लाख २५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी पुतण्या बालाजी याच्यावर संशय व्यक्त केला.

एमआयडीसी पोलीसांच्या तपासी पथकाने बालाजी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसानी त्याच्याकडू ३ लाख रुपयाचे दागिने, २ लाख ७ हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ७ हजार रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.