Pune News : 4 वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला तसेच 4 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस सिंहगड रस्ता पोलिसांनी नेपाळच्या सीमेरेषेवरून अटक केली आहे. आरोपी हा दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले आहे.

सलीम तबारक अन्सारी (वय 30, रा. जंगल बेलवा, पडरौना ठाणे, कुशीनगर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत समिना खातून बनाम सलीम अन्सारी (उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी नसीमाबरोबर आरोपीचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दोन -तीन महिन्यापासून आरोपी हुंड्यामध्ये मोटारसायकलची मागणी करून पत्नीचा छळ करू लागला. त्यामुळे फिर्यादीने मुलीला उत्तर प्रदेश येथे माहेरी नेले होते. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन गावातील लोकांच्या मध्यस्थीने पुन्हा नसिमाला आणले. त्यानंतर मात्र 14 एप्रिल 2016 रोजी नसीमाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे समजले.

याबाबत उत्तर प्रदेश येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. मात्र आत्महत्येची घटना नऱ्हे, पुणे येथे घडल्याने हा गुन्हा तपासासाठी सिंहगड रस्ता पोलीसाकडे वर्ग केला होता. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, पोलीस शिपाई मयूर पतंगे, पोलीस शिपाई संदीप पवार यांनी उत्तरप्रदेश येथे जाऊन तब्बल 12 दिवस तांत्रिक मदतीच्या साहाय्याने तपास करून आरोपीस नेपाळच्या सीमारेषेवरून ताब्यात घेतले.