Pune News : खुनी हल्ला करुन फरार झालेला आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सहकारनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई जर्मन बेकरीजवळ करण्यात आली. आरोपीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात 2019 मध्ये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. प्रणव प्रकाश शिंदे (वय-23, रा. कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणव याच्यावर 2019 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तपास पथकातील पोलिस हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी बापु खुटवाड व महेश मंडलिक यांना प्रणव शिंदे हा जर्मन बेकरीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पदरित्या फिरणाऱ्या आरोपीला प्रणव असा आवाज दिला. पोलिसांना पाहून आरोपीने तेथून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावरुन ताब्यात घेतले.

आरोपी प्रणव याचे वडिल माजी पत्रकार असून ते पत्नीपासून विभक्त राहतात. त्यांना भेटायला आरोपी जात होता. तो भेटायला आल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याच्या वडिलांबद्दल वाईट शेरेबाजी केली होती. याचा राग प्रणव याला आला होता. याच रागातून त्याने शेजारी व्यक्तीवर वार केले होते. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलिस हवालदार बापू खुटवाड, विजय मोरे, पोलिस नाईक सतिश चव्हाण, प्रकाश मरगजे, मनोज नर्मळे, भुजंग इंगळे, संदीप ननवरे, पोलिस शिपाई महेश मंडलिक, सचिन फुंदे, प्रदीप बेडिस्कर यांच्या पथकाने केली.