मोबाईलवरून महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ भामट्याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वेबसाईटवर अश्लील मजकूर अपलोड करून महिलेची बदनामी करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बांगूर नगर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, माहिती व तंत्रज्ञान कायदा ६६ (क), ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नायब अल्पेश वल्लभदास पारेख (४७) असं आरोपीच नाव असून तो मालाड येथे राहतो. त्याचा कस्टम ट्रान्सपोर्ट क्लियरिंगचा व्यवसाय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बँकेत नोकरीस असून त्या राहत असलेल्या इमारतीच्या सोसायटीचे पदाधिकारी म्हणून काम देखील पाहतात. १६ एप्रिल रोजी तक्रारदार महिला या कामावर असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने तक्रादार महिलेकडे लैंगिक सुखाबाबत, रिलेशनशिपबाबत विचारणा केली. तसेच Locanto.net या वेबसाईटवर तुमचा फोटो आणि मोबाईल क्रमांकासह जाहिरात दिलेली असल्याची माहिती महिलेला दिली. त्यानंतर महिलेस वारंवार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्तींकडून लैंगिक सुखाची मागणी करणारे फोन व व्हॉट्सअपवर रिलेशनशिपबाबत अश्लील मेसेज येऊ लागले. या प्रकाराविषयी सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता तक्रारदार महिला राहत असलेल्या सोसायटीच्या एका पुरुष पदाधिकाऱ्याबाबतचा अश्लील मजकूर Locanto.net या वेबसाईटवर टाकल्याचे आढळले.

तपासात क्लिष्टता असूनही तांत्रिक तपासद्वारे एका ईमेल आयडी शोधून पोलिसांनी आरोपीचा माग घेतला. तसेच सदर प्रकार हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडणुकीच्या वादातून झाल्याचे तपासात समोर आलं आहे.