आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, १ पोलीस जखमी

जत : पोलीसनामा ऑनलाईन – अटक वारंट असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या २ समर्थकांनी हल्ला केल्याने एक पोलीस जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी साडेबाराच्या सुमारास जत येथील पारधी तांडा येथे घडली असून पोलिसांनी संशियत हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रविण शहाजी पाटील असे जखमी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष काळे व त्याच्या २ समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

जत शहरातील पारधी तांड्यावर राहणाऱ्या सुभाष दिलीप काळे (वय ४५, रा. पारधी तांडा जत) याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी न्यायालयाने ३ अटक वारंट बजावले होते. जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्सटेबल प्रविण पाटील आणि संदिप साळुंखे यांना सुभाष काळे तेथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तेथे जाऊन त्याला तुझ्याविरोधात अटक वारंट आहेत. त्यामुळे तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगताच काळे याने मी तुमच्यासोबत येणार नाही काय करायचे ते करा. असे म्हणत जमाव जमवून मोठमोठ्याने आरडाओऱडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो पळून जाऊ लागला. त्यामुळे प्रविण पाटील यांनी त्याला पकडले.

दरम्यान त्याने पाटील यांना हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाटील व साळुंखे त्याचा पाठलाग करत होते. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी पाटील व साळुंखे यांच्यावर हल्ला केला. पाटील यांना काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. याचा फायदा घेऊन सुभाष काळे पसार झाला. त्यानंतर पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.