पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू ; सीआयडीचे पथक दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध दारू विक्री प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ६० वर्षीय आरोपीचा मृत्यू झाला आहे. फीट आल्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीचे पथक दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

सोपान मधूकर देवकर (६०, आंबेगाव खुर्द) असं मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई सुरु आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने सोपान देवकर याला १० एप्रिल रोजी रात्री अवैध दारू विक्री प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच ११ एप्रिल रोजी त्याला पोलीसांच्या कोठडीत असतानाच फीटचा झटका आला. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करून त्याची वैद्यकिय कोठडी घेतली होती. तीन ते चार दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान रविवारी रात्री ससून रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अशी माहिती सुत्रांनी दिली. तर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सीआयडीचे पथक दाखल झाले असल्याचीही माहिती मिळाली आहे.या प्रकाराने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठ समोर असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp chat