Aurangabad News : पोलिसांच्या गाडीतून आरोपीचे पलायन, हातकडी टोचत असल्याचं केलं नाटक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर एका आरोपीला पोलीस गाडीत बसवले असता त्याने पोलिसांच्या हाताला झटका देउन गाडीतून पळ काढला, ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी पावणे एकच्या दरम्यान घडली आहे. अमर भाऊसाहेब गायकवाड (रा.मुकुंदवाडी) असे त्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमर गायकवाड या आरोपीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका जणाला मारहाण करून त्यांच्या खिशातील २ हजार ७०० रुपये लुटले होते. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला मंगळवारी रात्री अटक केली होती. तसेच बुधवारी पोलीस कर्मचारी आरोपी अमरला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करणार होते. याकरिता पोलिसांनी त्याला दुपारी ठाण्यासमोरील पोलीस वाहनात बसविले असता, त्याचवेळी अमरने त्याच्या हातातील हातकडी गच्च झाल्यामुळे ती टोचत असल्याचे सांगितले होते.

त्यामुळे पोलीस त्याच्या एका हातातील हातकडी काढून दुसऱ्या हातात लावत होते. याचवेळी त्याने पोलिसांच्या हाताला झटका देउन पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला परंतु त्याने पोलिसांना चकमा देत पलायन झाला.