Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये इंग्रजी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकावर फायरिंग करणाऱ्या आरोपीला औरंगाबादमध्ये अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचविड परिसरामध्ये 9 जानेवारी रोजी इंग्रजी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकावर फायरिंग केल्याची घटना घडली होती. ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री घडली होती. या घटनेतील आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला महावीर चौक परिसरात शुक्रवारी (दि.15) रात्री अटक केली.

सुनील भगवान हिवळे (वय-28 रा. श्रीकृष्ण नगर हडको) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी (दि.9) रात्री अकराच्या सुमारास आनंदनगर जुनी सांगवी येथे आनंद ललित कुमार सोलंकी (वय-30 रा. स्पायसर कॉलेज रोड, जुनी सांगवी) यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या कानाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. याप्रकरणी आनंद सोलंकी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जखमी आनंद यांच्या ओळखीचा आरोपी सुनील याने जुन्या वादातून त्यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने यामध्ये आनंद बचावले.

दरम्यान, शुक्रवारी रात्री आरोपी सुनील शहरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. त्यावेळी आरोपी महावीर चौक परिसरात दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याची माहिती सांगवी पोलिसांना दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल जवखेडे, शेख हबीब, शिवाजी कचरे, अनिल थोरे, राहुल सूर्यतळ यांच्या पथकाने केली.