धक्कादायक ! पोलिसांना विजेचा झटका देऊन आरोपीने ठोकली धूम

पोलीसनामा ऑनलाईन – अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस घरी गेले, मात्र आरोपीने पोलिसांना विजेचा धक्का (electric-shock) देऊन पलायन केले. मुंबईतल्या ट्राम्बे परिसरात शुक्रवारी (दि. 20) ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस संबधित आरोपीचा शोध घेत आहेत.

अब्दुल करीम ऊर्फ दुबई अक्रम (27 रा. चित्ताकॅम्प परिसर, ट्राम्बे) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर मारहाण, लूट, चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी अब्दुल घरी आल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. मात्र त्याची कुणकुण लागताच अब्दुलने पोलिसांपासून सुटका करून घेण्यासाठी दरवाजाच्या कडीला विजेची वायर जोडली आणि विद्युतप्रवाह सुरू केला. एका पोलिसाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याला विजेचा झटका बसला. तरीही पोलिसांनी दरवाजा तोडला. मात्र अब्दुलने घराचा पत्रा तोडून धूम ठोकली. पोलीस आोरोपीचा शोध घेत आहेत.