Osmanabad News : ढाबा चालकावर गोळीबार केलेल्या आरोपीने रुग्णालयातून ठोकली धूम

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पंधरा दिवसापूर्वी तुळजापूर-लातूर मार्गावरील एका ढाबा चालकावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीने मंगळवारी (दि. 16) रात्री रुग्णालयातून धूम ठोकली. याप्रकरणी त्याच्यावर शहर ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

अभिषेक विश्वकर्मा (रा. नाशिक) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर चोऱ्या, घरफोड्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत. .

याबाबतची माहिती अशी की, नाशिक येथील अभिषेक विश्वकर्मा व त्याचे अन्य 5 साथीदार हे 3 फेब्रुवारी रोजी भंडारी शिवारातील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. तत्पूर्वी त्यांनी मद्यपान केले. यानंतर जेवणाच्या कारणावरुन त्यांचा कामगारासोबत वाद झाला. यावेळी ढाबा चालक बाळासाहेब मोरे हे आरोपींशी बोलत असतानाच अभिषेकचा साथीदार अर्जुन बडवणे याने त्याच्याकडील बंदूक काढून दोन काडतुसे झाडली. यातील एक गोळी बाळासाहेब मोरे यांना लागली. या घटनेनंतर 5 जण कारमधून तेथून पळून गेले. तर अभिषेक विश्वकर्मा यास कामगारांनी पकडून ठेवले. यावेळी काहींनी त्यास मारहाण केल्याने जबर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्याने पोलिसांची नजर चुकवून रुग्णालयातून पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने त्याचा शोध सुरु केला आहे.