धुळे : दरोड्यातील आरोपी जामनेर पोलिसांकडून जेरबंद

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जनावरांचा व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करून चार लाख रुपये किंमतीची जनावरे दरोडा टाकून चोरून नेणाऱ्या टोळीतील एकाला जामनेर पोलिसांनी आज अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.२४) रात्री दीडच्या सुमारास सुरत-धुळे मार्गावर घडली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामनेर पोलिसांनी कैलास बाबुलाल चव्हाण (वय-३४ रा. वरखेडे ता. चाळीसगाव) याला अटक केली आहे. तर त्याचे इतर साथीदार फरार आहेत. याप्रकरणी सलीम खान लागोदर खान (वय-३८ रा. बंदीफरिया ता. महुआ जि. सुरत) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी खान यांचा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी त्यांनी सुरत येथून ९ जनावरे खरेदी केली होती. जनावरे घेऊन ते धुळ्याकडे येत असताना आरोपी कैलास चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना बेदम मारहाण करून जनावरे, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. फिर्य़ादी यांनी तक्रार दिल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले होते. दरोड्यातील आरोपी जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गारखेडा येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.

ही करावाई जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गारखेडा गवतचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम, पोलीस नाईक किशोर परदेशी, योगेश महाजन, प्रकाश चिंचोरे, राहुल पाटील, हंसराज वाघ यांच्या पथकाने सापळा रचून अटक करून आरोपीला धुळे पोलिसांच्या ताब्यात दिले.